All

Wednesday, July 11, 2018

आकाश कंदिल

गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदील बनवायचो… आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाश कंदील लावला जायचा.


लग्न झाल्या पासून किंवा मुली झाल्या नंतर  त्यांच्या समोर  मात्र कधीच आकाश कंदील बनवला नव्हता. दर वर्षी असं जरुर वाटायचं की या वर्षी नक्की बनवु म्हणून.. पण   बांबूच्या काड्या न मिळाल्यामुळे राहुन जायचं. गेल्या विस पंचविस वर्षापासून  आकाश कंदील आमच्या घरी लागायचा, पण विकतचा.. ! आजकाल तर त्यांना माझं सांगणं खोटं वाटायला लागलं होतं. म्हणून या वर्षी तरी आकाश कंदील काहीही झालं तरीही घरीच बनवायचा हे पक्कं ठरवलं होतं… :)


सौ. म्हणते पूर्वीच्या काळी मुलांना बिझी ठेवायला म्हणून आई वडील  आकाश कंदील घरी करायला लावायचे. काल आकाश कंदील बनवायला घेतला तर, मी पण पहा ना दिवस भर नेटवर बसलो नव्हतो आकाश कंदील करायचा म्हणुन. म्हणजेच सौ. च्या कॉमेंट मधे तथ्य आहेच  काहीतरी.. असो..जरी ते खरं असलं तरी मान्य न करणं आपल्या हातातच आहे नां?? :)


या वेळी मात्र ठरवून टाकलं की आकाश कंदील नक्कीच करायचा.. अगदी काही झालं तरीही….. या वर्षी घरी केलेला आकाश कंदीलच लावायचा! अजुनही आठवलं की कसं मस्त वाटतं. आजची पोस्ट आहे आकाश कंदिलावरची.


बाजारात कितीही आकाशकंदील विकत मिळत असले तरीही घरच्या आकाश कंदीलाची त्याला सर येत नाही. आकाश कंदील करायचा म्हणजे त्याची तयारी आधी पासुन सुरु करावी लागते. सगळ्यात आधी आवश्यकता असते ती एका बांबूच्या काड्यांची. जर बांबू पुर्ण पणे सुकलेला असेल तर त्याला तासून त्याच्या लहान लहान काड्या बनवणे जमत नाही. त्या साठी त्या बांबूला पाण्याच्या पिंपात रात्रभर बुडवून ठेवावा लागायचा. थोडा भिजला की मग त्याचे हवे तसे तुकडे करता येतात.बांबू तासायला म्हणून कुऱ्हाडीला खूप धार करावी लागायची.


इथे मुंबईला आकाश कंदील बनवायचा तर बांबू आणणार तरी कुठुन?? मिलियन डॉलर प्रश्न?? शेवटी किचनमधल्या कोपऱ्या मधे असलेली केरसुणी (आका झाडू, कुंचा किंवा तुम्ही त्याला जे काय म्हणता ते) दिसली. तिकडे नजर गेली आणि सौ. ला पुर्ण कल्पना होतीच की मी आता काय करणार. पण त्यावर काहीही कॉमेंट द्यायचे तिने टाळले.
केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..


केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..


तो कुंचा घेउन बाल्कनीमधे गेलो, आणि सगळं बांधलेला प्लास्टिकचा दोर सुटा केला. त्या  केरसूणीच्या मधे काही बांबूच्या काड्या होत्या त्या काढून घेतल्या. एका केरसूणीच्या मधे ७ काड्या मिळाल्या, मला हव्या होत्या १४ काड्या. म्हणून दुसऱ्या केरसुणीची पण वाट लावली. नंतर साळसूद पणे दोन्ही केरसुण्या एकत्र करुन एक नवीन केरसुणी बनवून बांधून ठेवली, आणि वर पुन्हा सौ. ला हे पण सांगितलं की बघ, आधीपेक्षा पण चांगली करुन ठेवली आहे …  :)


धाकटी मुलगी सारखी आता तुम्ही काय करताय? किंवा आता तुम्ही काय करणार? या काड्यांचा आकाश कंदिल कसा काय तयार होईल? असे असंख्य प्रश्न विचारुन भंडाउन सोडत होती.


लहानपणी सुतळी चिकण मातीच्या पाण्यात भिजवून आकाश कंदिल करतांना वापरायचो. त्या साठी लगणारी चिक्कण माती,तुळशीच्या कुंडितील काढून वापरायचो. आकाश कंदिलाचा साइझ खुप मोठा असायचा म्हणुन बांबूच्या काड्या पण खूप जाड  जूड असायच्या. तेंव्हा साध्या ट्विलच्या दोऱ्याने मिडियम साईझचा आकाश कंदिल बनवता यायचा , पण मोठा बनवायचा म्हट्लं तर सुतळी वापरावी लागायची.आणि सुतळी मजबुत रहायला चिक्कण माती.


या वेळच्या आकाश कंदिलाचा साईझ अगदी लहानच आहे म्हणून,  आता मात्र साधा दोरा आणि फेविकॉल वापरुन फ्रेम बनवायचं ठरवलं.  पण कुठल्या आकाराच आकाशकंदील बनवायचा हे ठरल्याशिवाय   काड्यांचे तुकडे.. त्यांची साइझ कशी असावी हे ठरवू शकत नव्हतो.


मुलीला  विचारलं की डायमंड शेप की स्टार शेप?? तर स्टार शेप चा विजय झाला. आणि त्या अनुषंगाने  चार एकाच आकाराचे त्रिकोण करायला १२ काड्या , आणि त्या दोन स्टार्स ला एकत्र जोडण्यासाठी सहा तुकडे असा साधा सरळ हिशोब करुन कामाला लागलॊ.


बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला
    बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला


मला हव्या तशा एकाच मापाच्या १२ काड्या घेउन,आधी त्यांना एकाच लांबीचे  कापले आणि नंतर  स्टारची फ्रेम बनवली. साधा रीळाचा दोरा वापरुन कच्ची फ्रेम तयार झाली.


कागद चि कटवण्यासाठी मैद्याची खळ बनवायची घरच्या स्टोव्ह वर. आई ओरडायची, पण दुर्लक्ष करायचं झालं. सगळ्यांच्याच घरी हाच खेळ सुरु असायचा..आकाश कंदिल.. मित्र घरी येउन बघून जायचे, मदत पण करायचे. या वेळेस मात्र फेविकॉल का जबाब नहीं… :)


वर लावायचा कागद कुठला? तो तर घरी नव्हताच?? म्हणून तो पर्यंत फ्रेम पक्की करुन ठेवावी असा विचार केला. ६ पदरी दोरा केला, आणि त्याला फेविकॉल लाउन प्रत्येक जॉइंट भोवती गुंडाळले. अर्धा डबा फेविकॉल वापरले . १०० ग्राम चा डबा होता तो! इतकं करुन फ्रेम सुकत ठेवली पंख्याखाली.
चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.


चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.


संध्याकाळी मार्केटला जाउन पतंगीचा कागद विकत आणला. पण तो चि कटवायचा कसा?? हे विसरल्या सारखं झालं होतं. म्हणजे त्याचे तुकडे करुन लावायचे की एकच मोठा तुकडा लावून जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करावा, हेच लक्षात येत नव्हतं. शेवटी सरळ लहान लहान तुकडे करुन चिकटवले तर ते मजबुत होतील असं लक्षात आलं आणि म्हणून कागदाचे तुकडे ( अंदाजे मापा प्रमाणे ) केले.


आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .


आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .


काड्यांना फेविकॉल लावून त्यावर कागद चिकटवले आणि शेवटी तो ढांचा एकदाचा आकाश कंदीला प्रमाणे दिसू लागला. पण सगळा आकाश कंदील एकाच रंगाच्या कागदाने बनवल्यामुळे तो खास सुंदर गेट अप काही येत नव्हता.सौ.च्या म्हणण्याप्रमाणे त्याला सुंदर शी लेस लावली तर तो चांगला दिसेल , म्हणून उद्या येतांना लेस आणून लाउ असं ठरलं.
आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.


आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.


तसं , दुसऱ्या एखाद्या रंगाचा कागद घेउन त्याच्या पट़्ट्या पण वापरलया असत्या तरीही चाललं असतं. पण लेस मुळे काम सोपं होईल , आणि दिसायला पण जास्त चांगलं होईल म्हणून लेस आणायचं ठरवलं.


आता लेस लावल्यावर मात्र आकाश कंदिल एकदम मस्त दिसायला लागला. पतंगीचा कागद वापरला आणि आतमधे एक ६० चा बल्ब लावला की बाहेर खूप छान प्रकाश पडतो, म्हणून जिलेटीन च्या ऐवजी पतंगिचा कागद वापरण मला आवडतं.


हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही मिळुन एकत्र केलेली.. :)


हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही केरसुण्या एकत्र करुन बनवलेली.


अमरावतीला , अगदी लहान साइझ चा आकाश कंदील करून मग त्याला पतंगाच्या दोऱ्याला बांधुन उंच उडवायची पध्दत अजुनही आहे. त्या साठी एक लहानसा आकाश कंदील स्पेशली बनवावा लागतो. त्या आकाश कंदिलाला बहुतेक लाल रंगाचा एक जिलेटिन चा कागद वापरत.  दिवाळी आली, की रात्रीच्या वेळेस  आकाशामधे तुम्हाला असे बरेचसे आकाश कंदील उडतांना दि्सतील. या आकाश कंदीलामधे मेणबत्ती लावण्याची व्यवस्था केलेली असायची.


आकाश कंदील जर उडवायचा असेल तर एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुम्हाला एक मोठी पतंग  जी उडतांना खुप स्थिर उडते अशी घ्यावी लागते. आधी पतंग उडवायची मग नंतर दोऱ्याला एक लांब दोरा बांधुन त्याला आकाश कंदील बांधायचा. मोठी असल्यामुळे पतंग त्या आकाश कंदीलाला अगदी सहज पणे उंच घेउन जाते.


हा आकाश कंदील मी बनवलाय खूपखूप वर्षांच्या नंतर… त्यामुळे काही फारसा सफाईदार पणे जमलेला नाही. पण जस्ट आपला एक मजेशीर एक्स्पिरिअन्स शेअर करावा म्हणून इथे पोस्ट केलंय…


दिवाळिच्या दिवसात निरभ्र आकाशात आकाश कंदील उडवण्यातली मजा काही वेगळिच .. गच्चीवर पलंगावर पडुन रहायचं आणि उंच उंच जाणारा तो आकाश कंदील पहात रहायचं. गेले ते दिवस.. ते गाणं आहे ना गुलझारचं, दिल ढुंढता है… माझं आवडतं आहे ते… :)


No comments:

Post a Comment

Mahashivratri in India

Mahashivratri is a Hindu festival that is dedicated to Lord Shiva, one of the most important deities in Hinduism. The name "Mahashivrat...